बुलडाणा - योग आला तर त्या योगाला कोणीच थांबू शकत नाही. योगा-योगाने जे शक्य झालं ते होतेच. असाच प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातील नाद्रकोळी गावात आला आहे. योगा-योगाने माजी सरपंचांच्याच पत्नी सरपंच झाल्या आहेत. यामुळे नाद्राकोळी ग्रामपंचायतीकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे.
बुलडाणा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच निवड मंगळवारी 9 फेब्रुवारीला करण्यात आली. त्यात नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला राखीव असे आरक्षण सरपंच पदासाठी असल्याने माजी सरपंच संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे व उपसरपंच पदी मनोज जाधव हे निवडून आले. यावेळी सरपंच, उपसरपंचांच्या समर्थकानी गावात जल्लोषात गुलाल अंगावर घेऊन मिरवणूक काढली.
15 ग्रामपंचायत सरपंचाच्या निवडणुकीत नाद्राकोळी ग्रामपंचायत ठरली केंद्र बिंदू -
9 फेब्रुवारी पासून 51 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांची निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 9,10 आणि 11 फेब्रुवारीला ही प्रक्रिया होत आहे. 9 फेब्रुवारीला 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पाडली. यावेळी बुलडाणा तालुक्यातील नाद्राकोळी ही ग्रामपंचायत केंद्र बिंदू ठरली. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 11 सदस्यापैकी 7 सदस्यांच्या बळावर आशाबाई संजय काळवाघे व उपसरपंच पदी मनोज जाधव हे निवडून आले. विशेष म्हणजे माजी सरपंच असलेले संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे यांना यावेळी योगा-योगाने सरपंच पद मिळाले.
असा जुळून आला सरपंच होण्यासाठी योग -
नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 सदस्य संख्या आहे. ग्रामविकास पॅनेलचे 7 आणि लोकशाही ग्रामविकास पॅनेलचे 4 सदस्य निवडून आले आहेत. सरपंचासाठी ग्रामविकास पॅनेलमधून 2 सदस्यांनी बंड पुकारले होते. त्यापैकी एक महिला सदस्यांनी सरपंच पदासाठी नामनिर्देशन भरले होते. मात्र, लोकशाही ग्रामविकास पॅनेलच्या 4 सदस्यांपैकी 2 सदस्यांनी ग्रामविकास पॅनेलला सरपंच आणि उपसरपंच पदासाठी पाठिंबा दिला. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला राखीव असल्याने माजी सरपंच संजय काळवाघे यांच्या पत्नी आशाबाई संजय काळवाघे या 7 सदस्यांच्या मताने योगा-योगाने सरपंच झाल्या.