बुलडाणा - लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.६३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारी २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत २.१८ टक्क्यांनी वाढली आहे. २०१४ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघामध्ये ६१.३५ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅटसह बुलडाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत.
निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅटसह बुलडाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. या रुमला चारी बाजुंनी सुरक्षेचा कडा पहारा आहे. तर संपूर्ण इमारत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताब्यात आहे. सीआरपीएफचे जवान रुमची सुरक्षा करत आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी रुमवर देखरेख ठेवण्यात येत आहे.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी मतदान केले आहे.
हे ठरले निवडणुकीचे वैशिष्टय-
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांनी मतदान जनजागृतीला सुरुवात केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी 'गो व्होट' मोहिम सुरू केली होती. या निवडणुकीत प्रथमच मतदानाच्या खात्रीसाठी ईव्हिएमसोबत व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला. व्हीव्हीपॅटच्या वापरांसाठीदेखील मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली होती.