बुलडाणा - अकोला व बुलडाणा जिल्ह्यांना जोडणाऱ्या ३४ किलोमीटरच्या राज्य महामार्गावरील बाधित झाडांची विनापरवाना कापणी केल्याप्रकरणी सुधीर कन्स्ट्रक्शन या कंपनी विरुद्ध वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने झाडे कापण्याची परस्पर परवानगी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकार नसतानाही झाडे कापण्याची परवानगी देणाऱ्या अभियंत्यांचे नाव सुनील थोटांगे असे आहे.
आधी झाडे कापण्यासाठी महसूल व वन विभागाच्या परवानगीची गरज होती. मात्र, सध्या प्रशासनाने कामाची गती वाढवण्यासाठी फक्त वनविभागाला संबंधित अधिकार दिले आहेत. नियमानुसार कंत्राटदाराने कोणत्याही झाडाचे शासकीय मूल्यांकन न भरता तसेच वनविभागाची परवानगी डावलून फक्त अभियंत्याच्या पत्रावर शेकडो झाडांची अवैध कत्तल केल्याचा प्रकार जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यात घडला आहे. जागरूक नागरिकांनी संबंधित माहिती जळगाव-जामोद वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्यावर वनविभागाने याप्रकरणी कारवाई करत, सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या कंपनीने वरवट ते वणी-वरुळापर्यंत 34 किलोमीटरचा अकोला व बुलडाणा जिल्ह्याला जोडणारा राज्य मार्गाच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. कारवाईनंतर खामगाव सार्वजनिक बांधकाम अभियंता थोटांगे यांनी संबंधित रस्त्याचे काम अकोला सा.बां. विभागाकडे वर्ग केल्याचे सांगितले.
या बाधित झाडांची एकूण संख्या 682 असून, त्याचे मुल्यांकन 5 लाख 32 हजार 905 रुपये आहे. जळगाव-जामोदचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर झाडे कापण्याच्या परवानगीबाबत चौकशी केल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. यावरून प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सलीम खान यांनी कापण्यात आलेल्या झाडांना जप्त करून सुधीर कन्स्ट्रक्शन विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.