बुलडाणा - घराचा दरवाजा लवकर उघडला नाही, या कारणावरुन रागाच्या भरात पतीने पत्नीला ठार केले. ही घटना नांदुरा तालुक्यातील ग्राम नारायणपूर येथे शुक्रवारी घडली. वर्षा विष्णू खैरे (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
लोखंडी पलंगावर आपटून घेतला जीव
नांदुरा तालुक्यातील ग्राम नारायणपूर येथे वर्षा खैरे या पती विष्णू आत्माराम खैरें आणि चार मुलांसह राहत होत्या. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पती विष्णू खैरे घरी आले. त्यावेळी वर्षा यांनी लवकर दरवाजा उघडला नाही. त्यामुळे विष्णू यांना राग अनावर झाला. दरवाजा लवकर उघडला नसल्याच्या शुल्लक कारणावरुन विष्णूने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. इतकेच नाही तर, घरातील लोखंडी पलंगाच्या ठाव्यावर डोके आपटून आणि लाथा-बुक्क्यांनी मारून तिला जिवानिशी ठार केल्याची तक्रार वर्षा यांचा भाऊ योगेश बोंबटकर यांनी दाखल केली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपी विष्णू विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.