बुलडाणा - जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अकोली या गावातील एका विहिरीतून अचानक गरम पाणी येत असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या विहीरीशेजारील काही अंतरावरील असलेल्या विहिरीतून मात्र थंड पाणी येत आहे. यामुळे गावातील गरम पाण्याची विहीर बघण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत आहे.
विहिरीतून गरम पाणी येत असल्याने अनेक चर्चा
अकोली गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून गेल्या 14 तारखेपासून अचानक गरम पाणी येत आहे. विशेष म्हणजे या विहिरीशेजारी काही अंतरावरच दुसरी विहीर आहे. त्यातून सामान्य पाणी येते. गेल्या चार दिवसांपासून या विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने गावातील व परिसरातील नागरिक ही विहीर बघण्यासाठी गर्दी करत आहेत. पाणी अतिशय गरम असून हे पाणी अंघोळीसाठी वापरताना त्यात थंड पाणी घ्यावे लागते, असा दावा गावातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या गावात विविध चर्चांना उत आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर संग्रामपूर तहसीलदार यांनी याठिकाणी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाला याची माहिती दिली. त्यावरून जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाने गरम पाण्याचे नमुने घेतले आहे.
'पाण्याच्या तपासणीनंतरच येणार निष्कर्ष समोर'
विहिरीतल्या गरम पाण्यासह बाजूच्या विहिरीतील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच याचे नेमके कारण किंवा निष्कर्ष काढण्यात येईल, अशी माहिती भुजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विश्वास वालदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या हालचाली भूगर्भात होत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा - Rain Alert : आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता