बुलडाणा - गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारच्या रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिपरिप पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नद्या, नाले तुडंब भरून वाहत आहेत.
गेल्या दहा दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, खामगावसह आंत्रज, हिवरखेड, गारडगाव या गाव शिवारात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील रस्तेदेखील पाण्याखाली गेलेले आहे. वरवंट बकाल येथील सातलवन नदीला पूर आला आहे. तर, बावनबीर, वसाडी भागातील नदी नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
बुलडाणा, साखळी, सव, रुईखेड या भागातही मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झाले. तर, शेगाव तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसानंतर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून बुलडाणा, खांमगाव, चिखली, ज. जामोद, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगांव, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, दे. राजा या तालुक्यात 275.5 मिमी तर 21.2 सरासरीने व 36.28 टक्क्याने जिल्ह्यात पाऊस पडला आहे. सर्वात जास्त शेगांव तालुक्यात 108.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.