बुलडाणा- मागील काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेले काही दिवस पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. शेतीच्या ऐन खरीप हंगामात पाऊस नसल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली होती. मात्र, आज पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे नुकतेच कोंब फुटून बाहेर आलेले पीक माना टाकत होते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची भीती होती. त्यातच आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बुलडाणा, देऊळगावराजा, धाड, चिखली या परिसरात पाऊस झाला आहे. रविवारी संध्याकाळपासूनच सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, अढेरा या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने जांभूळ नदीला पूर आला होता. पाणी पुलावरुन वाहत असल्यामुळे अंढेरा ते मलकापूर पांग्रा रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद होती.