बुलडाणा : जिल्ह्याच्या विकासामध्ये शाळा आणि स्मशानभूमी ही दोन विकासकामे जिल्हा नियोजनमधून राबविण्यात येणार आहे. ही कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणार - जळगाव जिल्ह्यात शाळांना संरक्षण भिंती बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण कामे हाती घ्यावीत. जिल्ह्यात शाळा आणि स्मशानभूमीची कामे हाती घेण्यात यावी. केवळ एकाच बाबीवर लक्ष केंद्रीत करून खर्च केल्यास त्याचा परिणाम होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावे जलजीवन मिशनमध्ये घेण्यात यावी. पावसाचे मोजमाप योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचण होत आहे. ही बाब लक्षात घेता पावसाचे मोजमाप करणारी यंत्रणा सक्षम करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून यातून पाऊस मोजमाप करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याची देखभाल आणि दुरूस्तीही योग्यप्रकारे करण्यात येणार आहे.
पंचनामे लवकर करण्याचे आदेश - गेल्या काळात कोविडवरील उपाययोजनांमध्ये प्रयोगशाळा, ऑक्सीजन प्लाँट, रूग्णवाहिका आदीची व्यवस्था करण्यात आली. येत्या काळात नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उभारण्यात आलेली ही यंत्रणा सुरू राहून नागरिकांचा सुविधा होईल. लंपी आजारामुळे जनावरे दगावली असल्यास शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत व्हावी, यासाठी पंचनाम्याची गती वाढविण्यात यावी. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत आणि शेतीचे नुकसान झाल्यास पिक विम्याची रक्कम मिळण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीची बैठक - जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज पार पडली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्य अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते.