बुलडाणा - कोरोना संकटामुळे मार्च महिन्यापासून सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रार्दुभाव काहीसा कमी झाल्याने, येत्या सोमवारपासून कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या आटीवर, राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर उद्या उघडण्यात येणार नाही, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
ट्रस्टकडून सर्व तयारी
मंदिर उघडायला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र जोपर्यंत मंदिर उघडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारीत आदेश येत नाहीत, तोपर्यंत मंदिर उघडणार नसल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यासाठी ट्रस्टकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येताच मंदिर उघडले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 16 मार्चला हे मंदिर बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 16 मार्चपासून गजानन महाराजांचे मंदिर बंद आहे. मात्र आता 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र तरी देखील जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा मंदिर उघडण्याबाबत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत मंदिर उघडणार नाही, अशी भूमिका गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आली आहे. तसेच मंदिर सुरू झाल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्यात येईल. असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता गजानन महाराजांच्या भक्तांना महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.