बुलडाणा - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफ जवान चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय 38) यांचा संग्रामपूर तालुक्यातील मूळ गावी पातुर्डा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. आज (19 एप्रिल) रात्रीच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, सोशल डिस्टन्सिंग पाळून अंत्यसंस्कार होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले.
वीरमरण आलेल्या जवानाचे पार्थिव जम्मू-काश्मीरहून दिल्ली आणि दिल्लीहून नागपूरपर्यंत विमानाने तर नागपूरहून मुळगावी वाहनाने पातुर्डा याठिकाणी रात्री येणार असून, रात्रीच अंत्यसंस्कार होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 38 वर्षीय भाकरे हे सीआरपीएफ जवान आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना दहशतवाद्यांच्या चकमकीत हुतात्मा झाल्याची घटना 18 एप्रिलच्या संध्याकाळी घडली. ही माहिती कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात आज रविवारी (19 एप्रिल) रोजी पातुर्डा याठिकाणी होणार आहे. लॉकडाऊन काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारच्या ठिकाणी ३०×३० मीटरचा चौकन चौथरा अंत्यसंस्कारसाठी तयार करण्यात आले आहे.
या चौथऱ्याला पोलीस बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, २x२ चे बॉक्स तयार केले आहेत. वीर मरण आलेल्या जवानाचे परिवारातील सदस्य जवळचे नातेवाईक यांना त्यामध्ये उभे राहायला सांगितले जाणार आहे. सध्या जवानाचे पार्थिव श्रीनगर येथून विमानाने निघून दिल्ली ५ वाजेपर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर दिल्लीहून नागपूर येथे ७ वाजेपर्यंत येणार आणि नागपूरहून वाहनाने मुळगावी पातुर्डा याठिकाणी रात्री १२ वाजेनंतरच पोहोचणार आहे. आज रात्रीच अंत्यसंस्कार होणार आहे. यासाठी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील यांनी दिली आहे. वीरमरण आलेल्या जवान यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी एक मुलगा एक मुलगी आई-वडील असा मोठा आप्तपरिवार आहे.