बुलडाणा - जिल्ह्यात नव्याने 6 कोरोनाग्रस्त रुग्णाची बुधवारी वाढ झाली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या स्वाब नमुन्याच्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत.
या अहवालात मलकापूर येथील 25 वर्षीय तरूण, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण आणि खामगाव येथील 36 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगाव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड ( दे. राजा ) येथील पुरूष आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 1318 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे. सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 3 जून रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझीटीव्ह, तर 33 निगेटीव्ह आहेत. आज अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 81 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1318 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.