बुलडाणा - शहराला लागूनच असलेल्या जांभरुन गावात बुलडाणा वनविभागाच्या रेस्क्यू टीमने चक्क ८ फूट लांबीच्या अजगरला रेस्क्यू केले आहे. जांभरून गावातील रहिवासी शिवाजी मुळे यांच्या मालकीच्या जनावारांच्या गोठ्यात हे अजगर आढळून आले होते.
शिवाजी मुळे हे जनावरांना चारा टाकण्यासाठी सायंकाळी गोठ्यात गेले होते. यावेळी त्यांना गोठ्यात मोठा अजगर दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती बुलडाणा वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम जांभरुन शिवारातील शिवाजी मुळे यांच्या घरी दाखल झाली. त्यानंतर वनविभागाच्या टीमने त्या अजगराला रेस्क्यू करून बुलडाणा शहराजवळच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरुप सोडून देण्यात आले. सदर कार्यवाही वनपरीक्षेत्र अधिकारी बुलडाणा गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेसक्यु टीमचे सदस्य संदीप मडावी, दिपक घोरपडे व वन्य जीवप्रेमी निलेश जाधव यांनी पार पाडली.