बुलडाणा - राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ विकण्यात येत असल्याची कबुली खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. मात्र, हे प्रकार रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलणार, या प्रश्नावर त्यांनी मौन धारण केले.
रविवारी (19 जानेवारी) डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गर्दे हॉलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी स्वतः अन्न व औषध प्रशासन खाते मागून घेतल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभरात आपण किती भेसळयुक्त खातो, याची माहिती शिंगणे यांनी दिली. या खात्याचा मंत्री झाल्यापासून संबंधित गोष्टींचा अभ्यास करायला लागल्याने आता पाणी प्यायलाही भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. 'पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर'मध्ये देखील भेसळ असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
मलेशियातून आलेले पामतेल आपल्या तेलामध्ये मिसळून विकण्यात येत असल्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. या प्रकारची भेसळ सर्वत्र होत असून यावर सरकार लक्ष्य देत आहे, असे ते म्हणाले. मात्र, सरकारकडे या प्रकारची भेसळ थांबवण्यासाठी कोणते उपाय आहेत, यावर बोलताना मंत्री महोदयांनी मौन बाळगले आहे.