बुलडाणा - सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या पाणी परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.
वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे. मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी असल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जागृती होऊन जिल्ह्यात ही लोकचवळ म्हणून उभी रहावी, यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आल्याचे यावेळी खासदार प्रताप जाधव यांनी सांगितले. तर महाबीजचे संचालक वल्लभ देशमुख म्हणाले, की तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदीखोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होईल, शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होईल. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या 400 किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.
नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले, की गोसेखुर्दमधून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी 100 टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांच्या पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास 25 टिएमसी पाणी उपलब्ध होऊ शकेल. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड 47 किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्व्हेक्षण अपेक्षीत आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खासदार प्रताप जाधव यांनी त्यासाठी विकास निधीतून पाच लाख रुपये देऊन या 47 किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जल सल्लागार माधव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. सोबतच नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना काय फायदे मिळतील, तथा हा प्रकल्प आवश्यक का आहे? शेतीसाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान नदी जोड प्रकल्प एक लोकचळवळ होऊन पीपीपीच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसीत करण्यासाठी बुलडाण्यात होत असलेल्या प्रयत्नाबद्दल या परिषदेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. टंचाईवर मात करण्यासाठी तथा कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी हा प्रकल्प गरजेचे असल्याचे गडकरी यांनी पत्रात नमूद केल्याची माहिती खासदार प्रताप जाधव यांनी यावेळी दिली.