बुलडाणा - बँकांकडून पीक कर्जासाठी जवळपास २१ शेतकऱ्यांकडून आर्थिक तडजोडीसाठी रक्कम भरुन घेण्यात आली. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना ओरिएंटल बँक, अग्रणी बँक तसेच इतर बँकांकडून कर्ज देण्यात आले नसल्याने त्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याजवळ वेळोवेळी तक्रार,निवेदन सादर करुनही जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना बुलडाणा दौऱ्यावर आलेल्या अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा-शेतकऱ्यांचे ५१ हजार कोटी गेले कुठे? हार्दिक पटेलांचा सरकारला सवाल
गेल्या तीन-चार वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकरी कर्जासाठी बँकांमध्ये फेऱ्या मारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मार्फत शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी देण्यात आली. मात्र, या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना पूर्णपणे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कर्जमाफीच्या मिळालेल्या रक्कमेतून कर्जफेड करुन उर्वरित कर्जात तडजोडीची रक्कम भरली. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बँकेने दत्तक घेतलेल्या घाटनांद्रा आणि ढासळवाडी या गावातील शेतकऱ्यांना अधिकारी चकरा मारायला लावत आहे.
पीककर्ज न देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे शासनाने आदेश दिल्यावरही चार महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळालेले नाही. ढासाळवाडी व घाटनांद्रा येथील एकवीस शेतकऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले नाही. शेतकऱ्यांना कर्ज वाटप प्रक्रियेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, या बँकांकडील शासकीय ठेवी काढून घेऊ, असा इशारा प्रशासनाने बँकांना दिला होता होता. मात्र, यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.