बुलडाणा - बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना मंगळवारी मोताळा तालुक्यातील अंत्री बोराखेडी परिसरात घडली. गजानन जगदेव नागोलकर असं या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डोक्याला गंभीर दुखापत
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पेरणीची कामे सुरू आहेत. शेतीच्या कामासाठी गजानन नागोलकर हे सकाळी 7 वाजता आपल्या अंत्री बोराखेडी गावातील टाकळी शिवाराच्या शेतात गेले होते. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. दरम्यान गजानन नागोलकर शेतात जात असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. मोठ्या हिंमतीने गजानन नागोलकर यांनी बिबट्याशी दोन हात केले. या घटनेत नागोलकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
हेही वाचा - VIDEO : सांगलीत नदीकाठी १३ फुटी अजस्त्र मगरीचे दर्शन.. कृष्णाकाठ भयभीत