बुलडाणा - दिल्लीची निजामुद्दीन मरकझ देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. मार्च महिन्यात मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारोंच्या संख्येने देशभरातील आणि विदेशातील तबलिगी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुयायांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहभागी अनुयायांनी अनेक राज्यामध्ये प्रवास केला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे. या कारणाने तबलिगी जमातवर रोष आहे. तबलिग जमातचा नेमका उद्देश काय आहे, ती कशा पद्धतीने काम करते, याची माहिती बुलडाणा तबलिगी जमातच्या सदस्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. विशेष म्हणजे, ते स्वतः दिल्लीतील निजामोद्दीन मरकझमध्ये उपस्थित होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यात ते निगेटिव्ह आढळून आले आहेत.
'ते' मरकझमध्ये आलेच नव्हते -
सद्या मुस्लिम बांधवानी प्रशासनाचे आदेश पाळावे आणि घरात राहून नमाज पठण करावे, असे आवाहन बुलडाण्याचे तबलिगी जमात सदस्य यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी बुलडाण्यात जे चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते रुग्ण खासगी कामासाठी दिल्लीला गेले होते. ते मरकझमध्ये आले नसल्याचे सांगितले.
सरकारला सर्व माहिती देण्यात आली होती -
देशात ३० टक्के कोरोनाचा फैलाव मरकजच्या लोकांमुळे झाला असल्याचे केंद्र सरकार म्हणत आहे. यावर त्यांनी, दिल्लीतील निजामोद्दीन मरकजमध्ये जितके लोक असतात. त्यांची पूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली होती. एकूण किती लोक होते. ते कधीपासून राहत होते. इतकेच नव्हे तर यांना काय जेवण दिले जाते. याची ही माहिती पोलिसांना दिली होती, असे सांगितले. मरकज ट्रस्टने, आम्ही तुम्हाला वाहन, चालक देतो या फसलेल्या लोकांना काढा अशी विनंती केली होती. तरीही सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली, असेही त्या सदस्यांनी सांगितलं.