बुलडाणा - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील शौचालयाच्या कोरड्या टाकीत दीड वर्षांचे गायीचे वासरू पडले. दीड तासांच्या प्रयत्नांनतर त्याला बाहेर काढण्यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
तहानेने व्याकूळ झालेले गाईचे वासरू शुक्रवारी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फिरत होते. त्यावेळी ते वासरू आवारात नवीन बांधलेल्या इमारतीमधील शौचालयाच्या कोरड्या टाकीत पडले. सायंकाळच्या सुमारास निवडणूक विभाग बंद करून कर्मचारी नितीन बढे बाहेर निघाले. त्यावेळी त्यांना वासाराच्या हंबरण्याचा आवाज आला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला जाऊन बघितले असता कोरड्या टाकीत वासरू पडलेले त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दीड तासाच्या प्रयत्नानंतर वासराला सुखरूप बाहेर काढले.