बुलडाणा - जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण 64 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज (गुरुवार) बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून आठ रुग्ण कोरोनावर मात करत घरी पोहचले. यामध्ये मलकापूर येथील पाच, शेलापूर ता. मोताळा येथील दोन व साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना मागील दहा दिवसांपूर्वी भरती करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये चार महिला, एक मुलगी व तीन पुरुषांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 92 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची मागील दहा दिवसांपासून कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे या आठ रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाय योजनांमुळे हे रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रुग्णही आनंदाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.
त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, गर्दी करू नये, चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.