बुलडाणा - राज्यातील प्राथमिक शाळेतील पाहिली ते आठवी पर्यंतच्या ६६ हजार शाळेतील विद्यार्थ्यांना आयएसआय ट्रेंड मार्क कंपनीचे कापड घेऊन गणवेश शिवून देण्याचे आदेश शिक्षण विभागाने खासगी व शासकीय शाळांना दिले आहेत. त्या ट्रेडचे कापड शोधण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांची धावपळ होत आहेत. आयएसआय मार्क असलेले कापड कुठेही उपलब्ध नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक-मुख्याध्यापकांनी आक्षेप नोंदविला आहे. तसेच राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेसुद्धा आक्षेप नोंदवून आयएसआय ट्रेडचे कापड कुठे मिळते किंवा कोणत्या कंपनीत तयार होते, त्याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारला निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार कापडाचे गणवेश दिले जावे, ही बाब महत्त्वाची आणि नियमानुसार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिव राजेंद्र पवार यांनी ११ नोव्हेंबर रोजीच्या पत्रानुसार गणवेशाचे कापड खरेदी करताना आयएसआय दर्जाचे असावे, असे निर्देश दिले आहेत. आयएसआय मार्कचे कापड मुख्याध्यापक व शिक्षक कापड बाजारातील मोठं-मोठ्या दुकानात शोधत आहेत. मात्र, अशाप्रकारे कापडाला आयएसआय मानांकन नसते, अशी माहिती कापड व्यावसायिकांनी दिली आहे. आयएसआय ट्रेड मार्कचे कापड कुठेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याना त्या दर्जाचे कापड कुठून आणावे असा मोठा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे.
आयएसआय मार्कचे कापड खरेदी करण्याचे आदेश
कापडाच्या गुणवत्तेसाठी आयएसआय मार्क लागू नसताना शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता (ब्युरो ऑफ स्टैंडर्ड) आयएसआय मार्कचे कापड खरेदी करण्याचे आदेश शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले असल्याने सर्व शिक्षण विभाग संभ्रमात आहेत. बाजारात ते कापड कुठे मिळते, अशी विचारणा आता सर्वत्र केली जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांसाठी ४ कोटी २५ लाख १९ हजार ५०० रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ज्यामध्ये ८८ हजार १३१ सर्व मुली, एससी समाजाच्या २० हजार ९२१, एसटी समाजाच्या ६ हजार ११९ व दारिद्र्य रेषेखालील २६ हजार ५६१ गणवेशांकरिता लाभार्थ्यांचा समावेश आहे. पूर्वीप्रमाणेच गणवेशांचा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तो खर्च करण्याच पूर्ण अधिकार शालेय गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला दिला आहे. यावर शिक्षकांनी निर्णयाबाबत आक्षेप नोंदविला आहेत.
आता या दर्जाचे कापड घेताना शिक्षकांची अडचण होणार असून या निर्णयाबाबत शिक्षकांनीही आक्षेप नोंदविला आहे. त्या पत्रात दुरुस्तीची मागणी किंवा तसा आदेशच रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे आणि अशाप्रकारचे आयएसआय मानांकन कापड उपलब्ध होत नसेल; तर संदर्भित पत्रात आवश्यक दुरुस्ती करून शुध्दीपत्रक द्यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडे केली आहे.
शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्यांनी घाबरून जाण्याचा कारण नाही
बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ७३२ विद्यार्थ्यांसाठी ४ कोटी २५ लाख १९ हजार ५०० रुपयांचे अनुदान जिल्हास्तरावर आले आहे. अनुदान तालुका स्तरावर व शाळा स्थरावर स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच गणवेश कशा पद्धतीचे असले पाहिजे याबाबत मार्गदर्शक सूचना मुबंई प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आहेत, त्यामध्ये असे म्हटले गेले आहे. शक्यतो गणवेशाचे कापड बीआयएसने (ब्युरो ऑफ स्टैंडर्ड) जे स्टॅंडर्ड घालून दिलेले आहे. त्यानुसार असले पाहिजे, शासनाचा उद्देश हा की, या निधीचा चांगल्याप्रकारे वापर झाला पाहिजे. यानिधीतून मुलांना उत्तम दर्जाचे गणवेश प्राप्त झाले पाहिजे, त्या दृष्टीने ही सूचना दिलेली आहे. त्यामुळे शिक्षकांनी किंवा शालेय व्यवस्थापन समितीने घाबरून जाण्याचे कारण नाही. त्या जागी शक्यतो शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपण मुलांना उत्तम-उत्तम दर्जाचे गणवेश घेऊन या निधीतून घेऊन दिले पाहिजे एवढीच शासनाची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाण्याचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी दिली आहे.