बुलडाणा - जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांची, रस्त्यावरील वंचितांची दिवाळी साजरी करण्यासाठी दिव्या फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यांना जवळपास १७५ किलोचे फराळ, मिठाई वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले होते.
दिव्या फाउंडेशन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. गेल्या ५ वर्षांपासून दिव्या फाऊंडेशन समाजातील गोर-गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहे. वंचितांचे पुनर्वसन करणे, रस्त्यावरील मनोरुग्णांवर उपचार करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि वंचित समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिक साहित्य वाटप करणे यासारखे अनेक सामाजिक कार्य दिव्या फाऊंडेशने केलेले आहे.
यंदा वंचितांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिव्या फाऊंडेशनचे संयोजक अशोक काकडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सदस्यांच्या मदतीने गरिबांच्या पालात, घरी, शाळेत जाऊन त्यांना फराळ, मिठाई वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.