बुलडाणा - शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयचं आजारी पडल्यासारख्या अवस्थेत दिसून येत आहे. स्वच्छता आणि या रुग्णालयाचा काहीही एक संबंध नसल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. उपचारासाठी येथे आलेला रुग्ण बरा व्हायच्या ऐवजी आणखी जास्त आजारी पडतो, अशा प्रकारे या रुग्णालयात आणि परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या घाणीमुळे डुकरांचा मुक्त संचारही या रुग्णालय परिसरात आढळून येतो. हे सर्व घाणीचे साम्राज्या समोर दिसत असचानाही जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
एकूण 100 खाटांच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधांचा अभाव असल्याने अनेकदा रुग्णांची हेळसांड होते. रुग्णालय परिसरात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा दोन्ही बाजूंनी रिक्षांची रांग लागलेली असते. त्यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही. रुग्णालयात प्रवेश करताच सगळ्या वार्ड समोर रुग्णांची गर्जी दिसते ती फक्त डॉक्टरसाहेबांच्या येण्याची वाट पाहत असलेली. मात्र, डॉक्टर वेळेवर येत नसल्याची तक्रार येथील रुग्णांकडून केली जाते.
कित्येकदा डॉक्टरच हजर नसल्याने तसेच अपुऱ्या साधनांच्या अभावामुळे रुग्णांना अकोला किंवा औरंगाबादला पाठवले जाते. मुळात सरकारी दवाखाना हा गोरगरीब जनतेला मोफत सुविधा मिळाव्यात याकरिता असतो. मात्र, बुलडाण्यातील परिस्थिती याउलट आहे. ज्या रुग्णांना बाहेरगावी रेफर केले जाते त्यांना रुग्णवाहिकेची मोफत सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात नाही. अपघात झालेल्या रुग्णांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सामुग्री नाही. सिटी स्कॅन मशीन , एक्स रे मशीन जुनाट झाल्यामुळे रुग्णांना नाईलाजास्तव बाहेर 800 ते 1000 रुपये खर्च करावे लागतात.
रुग्णालयात साहित्याची वाणवा तर आहेच. मात्र, रुग्णालयाची इमारतही जीर्ण झाली आहे. इमारतीमध्ये काही ठिकाणी सतत पाणी झिरपत असते. काही ठिकाणच्या छताचे धबले पडत असल्याचीही तक्रार रुग्णांकडून केली जाते. रुग्णालयाच्या या अवस्थेबाबत कित्येकदा शल्य चिकित्सकांना सांगूनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी-
रुग्णालयातील या समस्या इथेच थांबत नाहीत. या सरकारी दवाखान्यात कर्मचाऱ्यांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे साफसफाई पाहिजे त्या प्रमाणात केली जात नाही. अस्वच्छता, उष्टे खाद्यपदार्थ, अन्न, राज्यात गुटखा बंदी असली तरीही रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पुड्या आढळून येतात, ठिकठिकाणी थुंकलेल्याचे डाग, उघडी गटार, फुटलेले पाईप ही सर्व दुरवस्था दिसून येते.
या सर्व दुरवस्थेबाबत रुग्णालयातील संबंधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, परिसरात पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाईपलाईनची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहेत. पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहे. रुग्णालय परिसरात येणाऱ्या जनावरांसांठी सापळे लावले आहेत. आपच्या स्तरावर स्वच्छतेसंदर्भात सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. निधीमुळे काही कामे रखडली असल्याची माहिती ही त्यांनी अप्रत्यक्षरित्या यावेळी दिली. डॉक्टरांनी रुग्णालयातीत असुविधांबाबतची माहिती दिली. मात्र, यासंबंधी दुरुस्तीसाठी कठोर अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न निरुत्तरीच राहतो.