बुलडाणा- भ्रष्टाचाराचे आरोप करुन काँग्रेसच्या नेत्यांना जेलमध्ये घातले जात आहे. मात्र, याच भाजप सरकारने आतापर्यंत 42 घोटाळे केलेले आहेत. त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा घोटाळाही असून पिक विम्याच्या हप्त्यापोटी 60 हजार कोटी रुपये वसूल करण्यात आले. मात्र, परतावा म्हणून फक्त ९ हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले. यातील उर्वरीत पैसे गेले कोठे? हेही शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे, असा घणाघाती हल्ला पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर केला. जळगाव जामोद येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच मित्रपक्षांकडून जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हार्दिक पटेल राष्ट्रवादीचे नेते तथा शिव व्याख्याते अमोल मिटकरी, काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, डॉ. स्वाती वाकेकर, प्रसन्नजीत पाटील यांची उपस्थिती होती.
विदर्भात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याच शेतकऱ्यांची मुलं आज बेरोजगार फिरत आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाने त्या मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. ज्या गुजरात राज्याला पाहून महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. त्या गुजरातमधील साडेनऊ हजार गावांना सिंचनासाठी कुठलीच व्यवस्था तेथील शासनाने केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशात सध्या मंदीचा माहोल आहे. या मंदीच्या सावटामध्ये तीन हजार करोड रोजगारांचे रोजगार बुडाले आहेत. मोठमोठ्या कंपन्या बुडत आहेत. मात्र, आम्हाला फक्त नरेंद्र मोदींचे भावूक भाषण दिसते, हे आमचे दुर्भाग्य असल्याचे मत पटेल यांनी व्यक्त केले.