बुलडाणा - कोरोना विषाणूवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. पहिल्या दोन फळीतील लसीकरणानंतर तिसऱ्या फळीतील लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये वयाच्या 60 वर्षांवरील व्यक्तीना उद्यापासून लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील 13 शासकीय रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालय आहे. या ठिकाणी विनामुल्य लसीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा - बुलडाण्याच्या राजुर घाटाच्या जंगलाला आग; पर्यावरणप्रेमी, वनविभागान व अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
अमृत हृदयालय व मेहेत्रे रुग्णालय बुलडाणा, कोलते रुग्णालय मलकापूर व कोठारी रुग्णालय चिखली या चार खासगी रुग्णालयांमध्ये दोन डोसेससाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी,अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ. सावके उपस्थित होते.
अॅप, संकेत स्थळावर व केंद्राच्या ठिकाणी करण्यात येणार नोंदणी
लसीकरणासाठी कोविन (COWIN), आरोग्य सेतू (AAROGYA SETU) या ॲपवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, https://selfregistration.cowin.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ॲप, संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्राच्या ठिकाणीसुद्धा नोंदणी सुरू राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये लसीकरण सत्राचे ठिकाण, दिनांक व वेळ याची माहिती देण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी भविष्यात आणखी रुग्णालये जोडण्यात येणार आहेत. एक डोस 250 रुपयांना मिळणार आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणीसुद्धा लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका लसीकरण केंद्राला 100 व्यक्तींचे दैनंदिन उद्दिष्ट असणार आहे. त्याचप्रमाणे 45 ते 60 वर्षांदरम्यान असलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींनासुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे.
खासगी रुग्णालयात दरापेक्षा जास्त दर घेतल्यास कारवाई
खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असताना शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिकचा दर घेतल्याचे समोर आल्यास किंवा तशी तक्रार आल्यास संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी 250 रुपये प्रतिडोस दर द्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले लसीकरण करण्याचे आवाहन
कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी या फळीतील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड लसीकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी रामामूर्थी यांनी आवाहन केले.
हेही वाचा - राज्यात एक हाती सत्ता मिळवण्याचा आमचा प्रयत्न- संजय राठोड