बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल 11 फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांच्यासह २५ आंदोलकांना अटक केली होती. आज पहाटे त्यांना चिखलीच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर आज साडेतीनच्या सुमारास त्यांच्यासह २५ साथीदारांना कडेकोट बंदोबस्तात बुलडाणा व जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने तुपकर यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत.
तुपकरांच्या अडचणी वाढल्या : बुलडाणा जिल्हा कारागृहात ठेवण्याऐवजी तुपकर तसेच त्यांच्या साथीदारांना अकोला किंवा अमरावती कारागृहात नेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जामीन मंजूर होईपर्यंत पुढील काही दिवस रविकांत तुपकर यांना अकोला किंवा अमरावती कारागृहात रहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे तुपकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
तुपकर न्यायालयीन कोठडीत : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत यांनी शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागणींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी आत्मदहन केल्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. रात्री त्यांची आणि काही कार्यकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना चिखली पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
रविकांत तुपकर यांचा अन्यायाविरुद्ध लढा: शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर सप्टेंबर 2022 पासून लढा देत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा, 24 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलन त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर राज्याचे कृषी सचिव, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि त्याचा पाठपुरावा करून त्याचे पत्र केंद्राला पाठविण्यात आले होते.
हेही वाचा : Ravikant Tupkar Self Immolation : रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न; आता सुरू केले अन्नत्याग आंदोलन