बुलडाणा - बुलडाण्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या रहिवासी परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य पथकाला सर्वेक्षण करण्यासाठी येथील नागरिकांनी मज्जाव करीत परत पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याच परिसरातील नगरसेविका तथा शिक्षण सभापती यांचे पती बबलू कुरेशी यांनी सर्वेक्षण पथकाला परत पाठविल्याचे पथकाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याच परिसरात राहणारे बुलडाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा नगरसेवकांनी नागरिकांना कोरोना या आजाराची माहिती देऊन प्रशासनाला मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तर आमच्या परिसरात जेव्हा आरोग्य पथक आले तेव्हा नागरिक त्यांना माहिती देण्यासाठी मज्जाव करून माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत होते, तेव्हा मी त्यांना एवढेच सांगितले, की सध्या तुम्ही येथून जा कारण त्यांच्यासोबत एकही नगर परिषदेचा कर्मचारी नव्हता. एरवी त्यांच्या गळ्यात आयडी कार्डही नव्हते, अशी प्रतिक्रिया बबलू कुरेशी यांनी दिली.
शनिवारी 28 मार्च रोजी एका 45 वर्षीय रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन कक्षात सकाळी मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी 29 मार्च रोजी नागपूरहून त्या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क होऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले. संपूर्ण बुलडाणा शहराला लॉकडाऊन करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहणाऱ्या परिसराला 'रेड झोन' एरिया म्हणून घोषित केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पहिल्या दिवशी रात्री 60 पैकी 24 तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले. त्या एकूण 32 नमुन्यांपैकी सोमवार 30 मार्च रोजी सायंकाळी 20 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आज (मंगळवार 31 मार्च) सकाळी पुन्हा त्याततील 3 नमुन्यांचे अहवाल आले असून त्या 'कोरोना पाॅझिटिव्ह' मृताच्या कुटुंबातील आणखी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत.
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण राहत असलेला संपूर्ण प्रशासनाने बंद केला आहे. नगर परिषदेच्या साहाय्याने रेड झोनच्या परिसरात 40 जणांचे आरोग्य पथक स्थापन करून परिसरातील रहिवाशांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आरोग्य पथक परिसरात गेले असता, यावेळी काही नागरिकांनी त्यांना सर्वेक्षण करायला मज्जाव करीत आम्हाला असे काही लक्षण आढळले तर, आम्ही स्वतः रुग्णालयात येऊ असे सांगितले. या पथकाला त्याच परिसरातील नगरसेविका तथा शहराचे शिक्षण सभापती यांचे पती बबलू करेशी यांनी त्यांना परत पाठवल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. यावेळी पथक परिसरात जाऊन ताप, सर्दी, खोकला असे कोरोनाचे लक्षण आहे का याबाबत सर्वेक्षण करणार होते..