बुलडाणा - एमआयडीसीमधील हमालांना दर २ वर्षानंतर हमालीच्या दरामध्ये २० टक्क्यांनी वाढ होण्याचा करार होता. असे असताना २ महिन्यांचा अतिरिक्त कालावधी उलटल्यानंतरही व्यापारी वर्गांनी हमालीचे दर वाढवले नाही. यामुळे खामगाव शहरातील एमआयडीसीमधील हमालांनी बुधवारपासून काम काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत दर वाढविला जात नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा हमाल संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसीच्या ऑईल मिलमध्ये काम करणाऱ्या हमालांना वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. सध्या जी हमाली मिळते त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह, शिक्षणाचा खर्च भागत नाही. त्यामुळे, हमालीच्या दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी पाठपुरावा करूनही 'दि सीड्स अँड केक्स मिलर्स असोसिएशन'कडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने बुधवारपासून 'जय गजानन हमाल संघटने'कडून काम बंद आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - बुलडाण्यात शिवाजी महाराजांसह आंबेडकर पुतळ्याचे अनावरन; आमदार कुटेंच्या उपस्थितीत कार्यक्रम
'दि सीड्स अँड केक्स मिलर्स असोसिएशन' आणि हमाल संघटनेमध्ये झालेल्या ठरावानुसार दर २ वर्षांनी हमालीमध्ये २० टक्के वाढ करण्याचा करार झालेला आहे. त्यानुसार दर दोन वर्षांनी म्हणजेच १ जानेवारीपासून २० टक्के हमाली वाढ होणे अपेक्षित होते. मात्र, यावर्षी अतिरिक्त २ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही व्यापाऱ्यांनी हमालीचे दर वाढविले नाही. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या हमाल संघटनांनी बूधवारपासून काम बंद आंदोलनाची सुरुवात केली आहे. तसेच जोपर्यंत हमालीचे दर वाढवून मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचेही हमाल संघटनेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'इंदोरीकर महाराजांचे कीर्तन खरे अध्यात्म नसून स्थूल अध्यात्म'