बुलडाणा - रेतीघाटांचा लिलाव न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात रेतीची तस्करी केली जात आहे. शासनाचे लाखांचे नुकसान होत असल्याचे पाहून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांचे एक 'विशेष पथक' गठीत करून मागील काही दिवसांपासून वाळू तस्करांविरोधात धरपकड मोहीम सुरू केली आहे. काल रात्री वाळू तस्करी करणाऱ्या एका टिप्परला पकडून चालक-मालक विरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - वीज बिले माफ करण्यासाठी विदर्भवाद्यांचा ४ जानेवारीला उर्जामंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव
काल (26 डिसेंबर) रात्री अंढेरा पोलीस ठाणे परिसरात अवैध गौण खनिज चोरीबाबत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाने एमएच- 28- बीबी- 3286 क्रमांकाचे टिप्पर पकडले. त्यामध्ये अंदाजे 3 ब्रास रेती ज्याची किंमत अंदाजे 15 हजार रुपये व टिप्पर किंमत अंदाजे 25 लाख रुपये, असा एकूण 25 लाख 15 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेती चोरी प्रकरणी वाहन चालक सतीश हिम्मतराव लहाने (वय 21 रा. सावखेड नागरे) व मालक राजू रामदास वाघ (वय 27 वर्ष रा. अंढेरा) यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अंढेरा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भा.द.वि.चे कलम 379, 34 सह कलम 3 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांच्या नेतृत्वाखाली पीएसआई प्रदीप आढाव, पो.ह. सुधाकर काळे, विलास काकड, पो.ना दिपक पवार, चालक सुरेश भिसे यांनी केली.
हेही वाचा - ...अन्यथा होणार नक्षलवादी, विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली आत्महत्येची परवानगी