बुलडाणा- रस्ता बांधकामाच्या वादातून मलकापूर शहरातील नगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रं. ५ येथील प्लॉट धारकाने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (२५ नोव्हेंबर) ला घडली होती. या घटनेबाबत माहिती समोर येताच मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. गजानन बावस्कर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
जिल्ह्यातील मलकापूर शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगर पालिका हद्दीतील जावरे यांच्या घरापासून ते बुलडाणा रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सदर रस्ता पालिकेच्या अंदाजानुसार १२ फूट रूंदीचा असून २ फुटाची नाली बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र, येथील गजानन बावस्कर यांनी घेतलेल्या प्लॉटच्या खरेदीत सदर रस्ता हा ३० फुटाचा आहे. त्यामुळे रस्ता बांधकाम आपण थांबवावे अशी भुमिका बावस्कर यांनी घेतली होती. त्यामुळे कंत्राटदार व बावस्कर यांच्यात वाद झाला.
या वादात माजी नगरसेवक अरूण अग्रवाल व त्यांचा मुलगा रजत अग्रवाल यांनी आपल्याला मारहाण केली होती. त्यामुळे आपण विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप बावस्कर यांनी केला आहे. दरम्यान, विष प्राशन केल्याने बावस्कर यांना मलकापूर येथील डॉ.काबराज हेल्थ केअर रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती सध्या स्थिर आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
तर, प्रभागाचे माजी नगरसेवक अरूण अग्रवाल यांनी आपण प्रभागाचे माजी नगरसेवक असल्याने सुरू असलेल्या रस्त्याची पहाणी करावयास गेलो होतो. त्यावेळी रहिवाशी गजानन बावस्कार यांनी रस्त्याचे काम करू नये, तसेच काम बंद करा. माझ्या खरेदीत सदरचा रस्ता हा ३० फुटाचा आहे. सदर रस्ता ३० फुटाचा करा, असा हट्ट धरीत काम बंद पाडले. इतक्यावरच न थांबता त्यांनी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच मी स्वतः त्यांना रूग्णालयात दाखल करून पोलिसांना याबाबत माहिती दिली असून आम्ही कुठलीही मारहाण किंवा दमदाटी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- रस्त्याच्या खोदकामावेळी घर कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही