बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच कृषी विधेयके तयार केली आहेत. सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही सुरू राहील. कॉंग्रेस सारख्या पक्षांनी या विधेयकांविरोधात सुरू केलेला प्रचार हा मतलबी आहे. शेतकऱ्यांनी त्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मानव संसाधन विकास राज्य मंत्री संजय धोत्रे यांनी केले आहे.
काँग्रेस सह विरोधी पक्षांनी कृषी विधेयकाला विरोधात देशभर आंदोलने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विधेयकाची फायदे शेतकऱ्यांना समजून सांगण्यासाठी शनिवारी 4 ऑक्टोबरच्या सायंकाळी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने आपल्या वचननाम्यात हे सर्व दिले होते आणि तेच आज या कायद्याला विरोध करीत आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारने तर राष्ट्रपतींच्या वटहुकूमच्या अंमलबजावणीसाठी एक अध्यादेश काढला होता. आता त्याच सरकारच्या पणनमंत्र्यांनी त्याला स्थगिती देण्यात आली. यासर्व प्रकारावरून राज्यातील सरकार आणि काँग्रेस पक्षाकडून फक्त विरोधासाठी विरोध करणे सुरू आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही घेणं-देणे नसल्याचा आरोप केंद्रीय राज्य मंत्री धोत्रे यांनी केला.
या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. संजय कुटे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार ऍड आकाश फुंडकर, अकोला येथील आमदार रंधीर सावरकर, चिखलीच्या आमदार स्वेता महाले, मीडिया सेल प्रमुख सगर फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे, अकोला महापौर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती.