बुलडाणा - शहराजवळील काही अंतरावरील असलेले गिरडा जंगलात शुक्रवारी (६ सप्टें.) सुमारे ९० कुत्र्यांचे मृतदेह आढळून आल्याची घटना काल (सोमवार) सकाळी उघडकीस आली होती. याबाबत पाडली शिवाराचे वनपाल राजेश शिपे यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी अज्ञाताविरोधात कलम ४२९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरडा या गावाजवळच्या जंगलाच्या रस्त्याच्या कडेला शुक्रवारी ८० ते ९० कुत्री मृतावस्थेत आढळून आली होती. चार गंजीत या मृत कुत्र्यांना टाकण्यात आले होते. यामुळे एकाच खळबळ उडाली होती. परिसरातील गिरडा, पाडळी, हनवतखेडसह अनेक गावांमध्ये दुर्घंधी पसरली होती. याबाबत माहिती बुलडाणा वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी आपल्या वनपाल, वनरक्षक यांचे पथक पाठवले होते. दरम्यान, जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा करत या मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
या प्रकरणी वनविभागाच्या पाडळी बिटमध्ये अशा पद्धतीने कुत्र्यांना हात-पाय बांधून क्रुरतेने मारुन आणून टाकल्या प्रकरणी पाडळी बिटचे वनपाल राजेश शिपे यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून अज्ञाताविरुद्ध कलम ४२९ नुसार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील हे प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. हे कुत्रे हे भोकरदनचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहे.