बुलडाणा - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या गोडाऊनला भेट दिली. या गोदामामध्ये जप्त करून ठेवण्यात आलेल्या गुटखा चोरण्याचा दोनदा प्रयत्न झाला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर डॉ. शिंगणे यांनी स्वत: पाहणी करून संपूर्ण विभागाची झाडाझडती घेतली. त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फटकारले.
बुलडाण्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या गोदामामधून डिसेंबर 2019 मध्ये 3 लाख रुपयांचा गुटखा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. हाच प्रकार पुन्हा 10 फेब्रुवारीलाही घडला. याची दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची आणि गोदामाची पाहणी केली. दुसऱ्यांदा चोरी झाली नसून चोरीचा प्रयत्न झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - घाऊक बाजारपेठेतील महागाईत वाढ; जानेवारीत ३.१ टक्क्यांची नोंद
22 लाख रूपयांचा गुटखा असलेले गोदाम पोलिसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सील करुन घ्यावे. सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलीस तैनात ठेवावेत, संपूर्ण प्रशासकीय इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश डॉ. शिंगणे यांनी दिले.
जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची माहिती घेऊन याबाबत संपूर्ण तपशील सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. मंत्र्यांच्या आदेशावरुन बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रदीप साळुंखे यांनी गुरुवारी रात्रीच गोदामाला सीलकरून पुढील कारवाई सुरू केली आहे.