बुलडाणा - यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलातून तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास करून, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सी-1 नावाचा वाघ 2019 ला आला होता. मात्र गेल्या एक महिन्यापासून हा वाघ या अभयारण्यात नसल्याचे समोर आले आहे. तो आपल्या मादी जोडीदाराच्या शोधात अजिंठा किंवा यावल अभयारण्यात आला असल्याचा आंदाज आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलातून सी-१ हा वाघ मादीच्या शोधात अदीलाबाद, मराठवाड, वाशिम मार्गे बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाला होता. तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून 2019 साली हा वाघ बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला. दरम्यान याच काळात वनविभागाच्या वतीने सी-1 वाघाच्या गळ्यात कॉलर आयडी लावून, त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. यामध्ये हा वाघ दोनदा अजिंठ्याच्या जगलात जाऊन परत आला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा वाघ मादीच्या शोधात भटकंती करत असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. सी-१ वाघासाठी वाघिणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे.
बॅटरी संपल्याने कॉलर आयडी काढले
सप्टेंबर २०१९ ला टिपेश्वर अभयारण्यातून सी-१ वाघ २ हजार किलोमीटरचा प्रवास करून, बुलडाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात आल्यानंतर त्यावर रिसर्च करण्यासाठी त्याला कॉलर आयडी लावण्यात आले होते. तो कुठे-कुठे जातो यावर लक्ष ठेवले जात होते. ज्ञानगंगा अभयारण्याचे संपूर्ण २० हजार हेक्टर जंगल तो फिरला. मात्र त्यानंतर रिसर्च संपल्याने आणि कॉलर आयडीची बॅटरी संपल्याने कॉलर आयडी काढण्यात आले, त्यामुळे सध्या हा वाघ नेमका कुठे आहे, हे सांगता येणार नाही. मात्र ज्ञानगंगा अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातून त्याची माहिती समोर येण्यास मदत मिळेल अशी माहिती ज्ञानगंगा अभयारण्याचे वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांनी दिली आहे.
सी-१ वाघाची मादीच्या शोधात भटकंती
सी-१ टायगरचा स्वभाव अत्यंत लाजाळू व हुशार आहे. सहजासहजी तो माणसाला दर्शन देत नाही. सी-१ दोन गोष्ठीसाठी फिरत आहे. एक जागेसाठी आणि दुसरा मादीचा शोध घेण्यासाठी. तो बुलडाण्याच्या ज्ञानगंगा अभायारण्यात आला होता. मात्र आता त्याने पुन्हा एकदा मादीच्या शोधात स्थलांतर केले आहे. तो अजिंठ्याच्या किंवा यावलच्या अभयारण्यात आल्याचा आंदाज वनाधिकारी मयूर सुरवसे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - आता 'एसआरए' प्रकल्पातील घरे विकता येणार, गृहनिर्माण मंत्र्यांचे संकेत