बुलडाणा : बुलडाणामध्ये सोयबीन कट्टे चोरणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर २ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशन येथे पुंडलीक नारायण शिंदे यांनी तक्रार दिली होती. कोलवड शिवारात त्यांची शेती आहे, शेतामध्ये घर आहे. दि १२ जानेवारी रोजी रात्री १० ते १३ जानेवारीचे सकाळी ७ वाजेदरम्यान त्यांच्या शेतात ठेवलेली ५८ कट्टे सोयाबीनपैकी ११ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरू नेले होते. अशी तक्रार त्यांनी पोलिसांना दिली होती. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहर पोलीस पथकाने कसून तपास सुरू केला होता.
कसून चौकशी केल्यानंतर माहितीसमोर : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अशितोष उर्फ बंड्या पडघान ( राहणारे मिलींद नगर), ओमप्रकाश उर्फ डॅनी राजाराम जाधव ( मिलींद नगर ), अॅपेचालक शेख शादाब शेख तस्लीम ( राहणारे इंदिरा नगर ) यांना ताब्यात घेण्यात आले. जेव्हा त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. याआधी कोलवड शिवारातील गुलमोहर हॉटेल समोरील तसेच माळविहीर, सावळा आणि येळगाव येथून शेतकऱ्यांच्या सोयाबीन कट्ट्यांची चोरी केल्याबाबत कबुली दिली. चोरी केलेला माल हा त्यांनी चिखली येथील व्यापाऱ्यास शेतकरी असल्याचे भासवून विकल्याचे सांगितले.
कट्टे चोरीला गेलेल्यांची नावे : पुंडलीक शिंदे यांचे ११ सोयबिन कट्टे, पवनकुमार आडवे यांचे १२ सोयाबीन कट्टे, प्रमिलाताई तायडे यांचे ४ कट्टे, सतिष जगताप यांचे ४ कट्टे, वैभव राजपूत यांचे २ कट्टे, असे ५ शेतकऱ्यांचे एकूण ३३ सोयाबीनचे कट्टे चोरीला गेले होते. चोरी गेलेला एकूण मुद्देमाल २ लाख ६ हजार रुपयांचा आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या आदेशाने डि.बी प्रमुख पोलीस उपनिरिक्षक सखाराम सोनुने, सहा.फौजदार माधव पेटकर, पो.हे.कॉ.प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे, ना.पो.का. सुनिल मौझे, गंगेश्वर पिंपळे, पोका. युवराज शिंदे, विनोद बोरे, शिवहरी सांगळे, म.पो.कॉ. सुनिता खंडारे यांनी केली आहे.