बुलडाणा - बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे. तसेच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास बसण्यासाठी व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी करणार असल्याची माहिती भारिप जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे यांनी दिली.
बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेले मतदान व मोजलेले मतदान यासंबधी प्रशासनाने दिलेल्या माहितीमध्ये 583 मतांची तफावत आढळली होती. ही माहीती ईटीव्ही भारतने समोर आणली होती.
दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला बुलडाणा लोकसभेसाठी मतदान झाले. यावेळी ईव्हीएम मशीनीमध्ये ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्यानंतर 23 मे ला मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी ईव्हीएम मशीनीमधून ११ लक्ष १८ हजार ६९ मते मोजल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दोन्ही आकडेवारीत ५८३ मतांची तफावत आढळली. दोन्ही आकडेवारीत तफावत आल्याची ईटीव्ही भारतने समोर आणल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनीनी याबाबत आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे निवडणूक प्रतिनिधी अॅड. धीरज मुंडे यांनी ५८३ मतांची तफावत का आढळून आली, याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे.