बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मलकापूर मतदारसंघात आजवरच्या इतिहासात केवळ दोनच वेळा काँग्रेसला विजय मिळवता आला. ते वगळता मलकापूर कायमच भाजपच्या ताब्यात राहिला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून याठिकाणी आमदार चैनसुख संचेती या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.
मलकापूरचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपच्या विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे. १९९५ पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचेती मलकापूरमधून निवडून येत आहेत. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आलेला नाही.
हेही वाचा - काँग्रेसने उमेदवारी दिलेले 'हे ' माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा?
मलकापूर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इतकेच महत्त्वाचे शहर आहे. महामार्गावर असल्यामुळे या शहराची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी महामार्गावरील उद्योग-धंद्याशी निगडीत आहे. पण अलीकडे महामार्ग आणि एमआयडीसीची दूरवस्था ही एक प्रमुख समस्या आहे. नांदुरा-जळगाव-जामोद उड्डाणपूल, मलकपूरचा पाणी प्रश्न, जिगाव प्रकल्पाचे रखडलेले पुनर्वसन आणि काम, उद्योग किंवा एखादा मोठा प्रकल्प या भागात नसल्यामुळे रोजगारीचा मोठा प्रश्न या भागात कायम आहे. आजही नांदुरा शहरात साधे ग्रामीण रुग्णालय नाही.
मलकापूर हा पश्चिम विदर्भातील बुलडाण्याचा एक तालुका आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ बुलडाणा जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी हा मतदारसंघ खानदेशातील रावेर मतदारसंघाला जोडला जातो. लोकसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांना ६० हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणे काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. त्यातच, पक्षातून उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. इच्छुकांची यादी लक्षात घेता सक्षम उमेदवार निवडने काँग्रेसाठी अडचणीचे ठरणार आहे.
हेही वाचा - भाजपला देशात फॅसिझम आणायचा आहे... सुजात आंबेडकर यांची विशेष मुलाखत
या मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लीम, बौद्ध आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, जातीय बंधनात न अडकता अल्पसंख्याक असलेल्या आमदार चैनसुख संचेती यांच्या पाठीशी गेल्या पंचवीस वर्षांपासून इथला मतदार आहे. संचेती यांच्या पंचवीस वर्षांच्या कामाचा आढावा घेत काँग्रेस त्यांच्यासमोर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील पंचवीस वर्षांच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने आमदार संचेती यांना पराभूत करण्याकरता जातीय समीकरणे पुढे ठेवून काँग्रेस उमेदवार दिले. यामध्ये हाजी रशीद जमादार हे मुस्लीम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशाप्रकारे उमेदवार देऊनही संचेतींना पराभूत करता आले नाही.
आता देशात जरी भाजपला अच्छे दिन येत असले तरी मलकापूर मतदारसंघात मात्र भाजप अडचणीत आहे, अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणारे हरीश रावळ यांनी मिळवलेले मतदान. ते आज काँग्रेसमध्ये असून मलकापूरचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने काँग्रेसला निश्चितच बळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी नांदुरा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांचाही काँग्रेस प्रवेश झाला आहे. एकडे यांची नांदुरा शहरावर चांगली पकड आहे. गेली वीस वर्षे नांदुरा नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. एकडे यांच्या येण्यामुळे सुद्धा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मलकापूर मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षाकडे नांदुरा बाजार समितीचे सभापती बलदेवराव चोपडे, मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्माराव पाटील, प्राचार्य गजानन बावस्कर आणि माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी उमेदवारी मागितली आहे.
हेही वाचा - सांगलीत काँग्रेसकडून विश्वजित कदम, विक्रम सावंत यांची उमेदवारी जाहीर!
दुसरीकडे याच मलकापूर शहरात नव्याने उदयास आलेल्या एमआयएम या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहजाद खान यांचे होमटाऊन असून एम आय एम या राजकीय पक्षाचा सध्या कुठल्याही पक्षाशी युती नसल्याने त्यांचाही उमेदवार रिंगणात येण्याची शक्यता आहे. मलकापूर शहरात या पक्षाची अल्पसंख्याक समाजात पकड असून नगरपालिकेत यांनी 10 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर नगराध्यक्ष साठी स्वतः जिल्हाध्यक्ष शहजाद खान निवडणूक रिंगणात उभे होते. निकालाअंती 4 नगरसेवक निवडून आले तर 4 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले शहजादा खान यांना 7 हजार 500 मते मिळाले होते. यामुळे एमआयएमच्या उमेदवाराला पडणारी मते ही भाजपच्या पत्त्यावर पडणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मलकापूर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित फॅक्टर याठिकाणी प्रभावी ठरेल, असे चित्र दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसकडून योग्य उमेदवार मिळाल्यास भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
2014 च्या निवडणुकीत झालेले मतदान
१) चैनसुख संचेती (भाजप) - 75,965
२) डॉ. अरविंद कोलते (काँग्रेस) - 49,019
३) वसंत भोजने (शिवसेना) - 26,291