बुलडाणा - दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुलडाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर होणारी घटमांडणी यावर्षी रद्द करण्यात आली आहे. यावर्षी २६ एप्रिलला घट मांडणी होणार होती. साडे तीनशे वर्षांची घटमांडणी परंपरा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांपासून घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती. ती परंपरा आजपर्यंत सुरू आहे. शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवळला येत असतात व भाकीत ऐकूण त्यावरून वर्षभरातील शेतीच नियोजन करतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते व काही खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. या घटांमध्ये रात्रभरात होणाऱ्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयसमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेतीविषयक, राजकारण, नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक-पाणी कसे राहील, याबाबत अंदाज वर्तविले जातात.
मात्र, यावर्षी देशावर कोरोना संकटामुळे लॉकडाऊन, जमावबंदी असल्याने २६ एप्रिलच्या दिवशीची घटमांडणी रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज सारंगधर महाराज वाघ यांनी सांगितले आहे. तर साडे तीनशे वर्षांपासून आत्तापर्यंत एकदाही ही मांडणी रद्द झाली नसल्याची प्रतिक्रिया सारंगधर महाराज वाघ यांनी देत सर्वांना आप-आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.