बुलडाणा - संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील जमिनीच्या वाटणीपत्रासाठी अर्जदाराकडून 20 हजार रुपयांची लाच घेतल्याचा व्हायरल व्हिडिओची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत महसूल उपजिल्हाधिकारी अभिजात नाईक यांच्या प्राथमिक चौकशीनुसार दोषी आढळल्याने, अखेर संग्रामपूर तहसीलदार समाधान राठोड यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशाने तत्काळ निलंबित केले आहे, तर राठोड यांनी खातेनिहाय चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांनी दिली.
कासम वजीर सुरत्ने, इमाम जुम्मा केदार, महेबूब वजीर सुरत्ने यांनी आलेवाडी शिवारातील शेत गट क्र.101 मधील जमिनीमध्ये संग्रामपूर तहसील कार्यालयात वाटणीसंदर्भात 30 डिसेंबर 2019लाअर्ज दाखल केला. मात्र, या अर्जावर कारवाई करण्यात आली नसल्याने वरील अर्जदारांनी संग्रामपूर येथील तहसीलदार समाधान राठोड यांना भेटून अर्जावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर तहसीलदार राठोड यांनी पैश्याची मागणी केली. दरम्यान जळगाव रोडवरील पेट्रोलपंपाजवळील शिवनेरी ढाबाजवळ तहसीलदार समाधान राठोड हे शासकीय वाहनाने येऊन अर्जदारांकडून वाटणीसाठी 20 हजार रुपये घेतले व निघून गेले. याचा यावेळी व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जमीन वाटणीबाबत दिलेल्या कासम वजीर सुरत्ने, इमाम जुम्मा केदार, महेबूब वजीर सुरत्ने या अर्जदारांनी तहसीलदार समाधान राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली होती.
याबाबत व्हायरल व्हिडिओची बातमी ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तहसीलदार राठोड यांची चौकशी करण्यासाठी महसूल उपजिल्हाधिकारी अभिजात नाईक यांच्याकडे सोपवली होती. यावेळी तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलविले असता ते हजर झाले नाही. दरम्यान, प्राथमिक चौकशीत दोषी आढल्याचे निष्पन्न झाल्याने संग्रामपूर तहसीलदार समाधान राठोड निलंबित करण्यात आले आहे.