बुलडाणा - सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवाशी व भारतीय सैन्यदलात द्रास टायगर हिल जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना बर्फवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीत वीरमरण आल्याची घटना मंगळवारी १५ डिसेंबरच्या रात्री समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला असून वीरमरण आलेल्या जवानाचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी रविवार २० डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
२००८ मध्ये झाले होते सैन्य दलात भरती -
सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील प्रदीप २००८ ते ०९ च्या दरम्यान भारतीय सैन्यदलामध्ये औरंगाबाद येथे भरती झाले होते. त्यांचा विवाह २०१४ साली कांचन या युवतीसोबत झाला होता. भारतीय सैन्यदलात असताना त्यांनी सुमारे ११ वर्षे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावले. दरम्यान द्रास टायगर हिल जम्मू काश्मीरमध्ये कर्त्यव्यावर कार्यरत असताना बर्फवृष्टीमध्ये त्यांना वीरमरण आल्याची घटना मंगळवारी १५ डिसेंबरच्या रात्री समोर आली. यामुळे सिंदखेडराजा सह बुलडाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा सुरज, सार्थक, जयदीप असे तीन मुले असून आई श्रीमती शिवनंदा साहेबराव मांदळे व भाऊ संदीप साहेबराव मांदळे कृषी सहाय्यक असून त्यांचा एक भाऊ विशाल साहेबराव मांदळे हा भारतीय सैन्य दलामध्ये सध्या पश्चिम बंगालमधील पन्हागड या ठिकाणी कार्यरत आहे.
२० डिसेंबरला होणार अंत्यसंस्कार -
आई वडिलांनी मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले व चांगल्या ठिकाणी नोकरीला लावले. प्रदीप यांच्या वडिलांचे २०१७ साली निधन झाले आहे. मोठा मुलगा म्हणून प्रदीप यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे घरात कर्ता पुरुष गेल्यामुळे मांदळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संदीप साहेबराव मांदळे यांना रात्री नऊच्या दरम्यान सैन्य दलाकडून फोनवरून भावाला वीरमरण आल्याची माहिती मिळाली. प्रदीप साहेबराव मांदळे यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पळसखेड चक्का येथे रविवारी २० डिसेंबर रोजी येणार असून तेथेच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.