बुलडाणा - माजी मंत्री सुबोध सावजी यांनी कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हेतूने अनोखी शक्कल लढवली आहे. जिल्ह्यातील स्वराज संस्था असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत तथा नगर परिषदांसाठी त्यांनी एक योजना आणली आहे. 1 मेपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणकरण पूर्ण करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला एक लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या 'संपना सुबोध सावजी ट्रस्ट' हे बक्षिस देणार असल्याची घोषणा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. यासंदर्भात सुबोध सावजी यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांना माहितीस्तव एक अर्ज सादर करून या योजनेची माहिती स्थानिक स्वराज संस्थांना देण्याची विनंती केली.
कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी युक्ती -
बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रूग्ण संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. कोरोनापासून संरक्षणसाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. त्यामुळे खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कोरोना लसीकरण झपाट्याने होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी अनोखी शक्कल लढवत बक्षिस योजना आणली आहे. जिल्ह्यातील जी ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगर परिषद आपल्या क्षेत्रातील नागरिकांचे शंभर टक्के कोरोना लसीकरण करून घेईल, अशा स्थानिक स्वराज्य संस्थेला एक लाखाचे बक्षीस विकासनिधी म्हणून दिला जाणार आहे.
हेही वाचा - स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान घसरले; बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानही पुढे