बुलडाणा - गाडीला कट का मारला म्हणून रात्रीच्या वेळी रस्त्यात वाहन चालकाला लुटणाऱ्या चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश भारत फोलाने, असे चोराचे नाव आहे. गेल्या हा २ वर्षापासून हा फरार होता. दरम्यान, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला चोराला ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे. ही कारवाई रविवारी १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. या चोरट्यावर चोरी, घरफोडी, जबरीचोरी असे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता-
चिखली तालुक्यातील कोलारा येथील श्रीकृष्ण मधुकर सोळंकी २ मे २०१९ रोजी दुचाकीच्या दूरूस्तीचे काम करून ते बाजार समिती जवळून घरी कोलारा येथे जात होते. दरम्यान रात्री पावने नऊ वाजेच्या सुमारास अचानक एका व्यक्तीने हात देवून तंबाखू आहे का, असे विचारले. परंतु त्याच्या म्हणण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यानंतर पाठीमागून दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या दुचाकीसमोर येवून आमच्या गाडीला कट का मारला, असे म्हणून वाद घालण्यास सूरवात केली. तसेच त्या अज्ञात युवकानी त्यांच्या खिशातून जबरीने पैसे काढून घेतले. या तक्रारीवरून चिखली पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी हे फरार होते.
प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांनी एक पथक तयार केले. दरम्यान हे पथक चिखली शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी गणेश भारत फोलाने (रा संभाजी नगर चिखली) हा जाफ्राबाद रोड चिखली येथे हजर असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीसांनी उपरोक्त ठिकाणी जावून आरोपीस ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी त्यास चिखली पोलीसांच्या हवाली करण्यात आले.
आरोपी दोन वर्षापासून फरार होता-
विशेष म्हणजे या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी हा दोन वर्षापासून फरार होता. या आरोपीवर चोरी, घरफोडी, जबरीचोरी इत्यादी गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते, पोलीस उपनिरिक्षक निलेश शेळके, दिपक पवार, गजानन चतुर, विजय सोनोने व नदिम शेख यांनी केली आहे.
हेही वाचा- पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आजपासून फास्टटॅग बंधनकारक