बुलडाणा - सरकारने ५ वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) बुलडाण्यात दाखल होत आहे. तत्पूर्वी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून रात्रीपासून विरोधी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात दाखल होणार आहे. त्यानंतर खामगाव आणि शेगावात सभा होणार आहेत. सभेत विरोधी पक्षातील काही मंडळींकडून निवेदने, घोषणाबाजी अथवा आंदोलने करण्याचे चिन्हे असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. यासाठी रात्रीपासूनच जिल्हाभरात स्थानबद्ध मोहीम हाती घेण्यात आली असून रात्रीपासून शेगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अमित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या नंदा पाऊलझगडे, आनंदा खाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष गोपाल तायडे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष निलेश घोंगे, आकाश पाऊलझगडे, सागर पाऊलझगडे यांच्यासह संग्रामपूर शेगाव खामगाव आणि मलकापुरात अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन घेतले आहे. यामुळे विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होत आहे.