बुलडाणा - मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नव्हता. अखेर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत 80 तासांचे सरकार कोसळले होते. तरीही बुलडाण्याच्या राजकारणावर याचा परिणाम झाला नाही. कारण, जरी एक डॉक्टर मंत्री पदावरून गेले असले तरी, पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात दुसरे डॉक्टर मंत्री पदावर येणार असल्याचे चिन्ह आहे.
हेही वाचा - आज उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
भाजपचे डॉ. संजय कुटे हे मंत्री पदावरून गेले तरी, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा शरद पवारांच्या जवळचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आणि मेहकर मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांना मंत्रिपदावर विराजमान करावे, अशी जनतेची मागणी आहे. जरी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटातील दोन डॉक्टर मंत्री पदासाठी दावेदार असले तरी, मात्र दोघा डॉक्टरांमधून एका डॉक्टरला मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषक गजानन धांडे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोडले 'सामना'चे संपादकीय पद; 'हे' आहेत नवे संपादक
देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा अजित पवारांच्या सोबतीने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला. मात्र, अजितदादांचे बंड शमले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. सरकार कोसळल्याने भाजपला मोठा धक्का बसला. जिल्ह्यातही याचे पडसाड दिसून येत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात जळगाव, जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांना शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले होते. पुन्हा सरकार आल्यावर त्यांचे मंत्रिपद जवळपास निश्चितच मानले जात होते. विशेष म्हणजे, डॉ. संजय कुटे हे अभ्यासू व फडवणीस यांचे जवळचे असल्याने फडणवीस सरकारमध्ये कुटे यांचे मंत्रिपद निश्चित होते. परंतु, नशिबाने ही संधी त्यांना मिळाली नाही. विजयाचा चौकार मारत मोठ्या मताधिक्क्याने कुटे निवडून आले. परंतु, ऐनवेळी युतीत बिनसले आणि कुटे यांना मंत्री पदापासून दूर रहावे लागत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यात बुलडाणा जिल्ह्यात ज्येष्ठ आमदार तथा शरद पवार यांचे जवळचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सत्तास्थापनेच्या घडामोडीमध्ये चर्चेत राहिले. ते प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीमध्ये ज्येष्ठ नेत्यांसोबत दिसून आले. तर, अजित पवारांच्या बंडानंतर पहिल्यांदा शरद पवारांकडे पोहचून पत्रकार परिषदेत भूमिका मांडणारे डॉ. शिंगणे हेच होते. पवारांनी स्वत: डॉ. शिंगणे यांची ज्येष्ठ सदस्य, माजी मंत्री अशी ओळख पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, डॉ. शिंगणे हे माजी कॅबीनेट आणि राज्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहिला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत. त्यात मेहकर मतदारसंघातून हॅट्रीक करत मोठ्या मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे डॉ. संजय रायमूलकर, बुलडाण्यातून संजय गायकवाड, सिंदखेडराजामधून राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, मलकापूरमधून काँग्रेसचे राजेश एकडे तर, जळगाव जामोदमधून भाजपचे डॉ. संजय कुटे, खांमगावमधून अॅड. आकाश फुंडकर, चिखलीमधून श्वेता महाले यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. संजय रायमूलकर यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मंत्री पदाची लॉटरी कोणालाही लागो मात्र, एक डॉक्टर गेले तर दुसरे डॉक्टर पुन्हा मंत्रिपदावर येणारच, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.