बुलडाणा: जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात एका माथेफिरु पतीने पोलीस असलेल्या पत्नीची आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःही एका विहिरीत आत्महत्या केली. किशोर कुटे असा या माथेफिरू पतीचे नाव आहे. त्याची पत्नी वर्षा दंदाले ही चिखली पोलिसात महिला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती.
'त्या' माथेफिरूची विहिरीत आत्महत्या: वर्षा दंदाले ही आपली नाईट ड्युटी आटोपून सकाळी आपल्या पंचमुखी हनुमान परिसरातील घरी परतली होती; मात्र दुपार दरम्यान या माथेफिरू पतीने पत्नी आणि दीड वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. त्यानंतर स्वतःही अंढेरा शिवारात एका विहिरीत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण चिखली शहर हादरून गेले आहे. सुदैवाने एक आठ वर्षांची मुलगी मात्र बचावली आहे. ती शाळेत गेली असल्याने तिचा जीव वाचला असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू: माथेफिरू किशोर कुटे याने हे हत्याकांड घडवून स्वत: आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तीनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपासानंतरच या खुनामागील नेमकं कारण कळू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात आई आणि मुलगी दोघांचे फोटो चित्र विचलित करणारे होते. अशा परिस्थितीमध्ये नेमक्या कोणत्या कारणाने आणि भर दुपारी ही घटना घडली, या मागचे नेमकं कारण काय? याकडे आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
'तो' पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला: पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची अशीच एक घटना हिंगोली तालुक्यातील डीग्रस कराळे येथे घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने खून केल्यानंतर तो रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. योगिता संतोष कऱ्हाळे (२८) अस मयत पत्नीचे नाव होते. संतोष कराळे आणि पत्नी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण झाले. यानंतर संतोषने पत्नीवर हल्ला चढविला आणि तिचा खून केला. विशेष म्हणजे, त्यानेच ही बाब आपल्या सासरकडच्या मंडळींना सांगितली.
हेही वाचा: