बुलडाणा - जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे सध्या त्यांच्या एक फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी गेल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 'महादेवा मला मार्ग दाखव', असे साकडे घातले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या २४ ऑगस्टला जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे आमदार बोंद्रे यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करीत असताना त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यावेळी बुलडाण्यातील चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी विखे पाटलांची भेट घेतली होती. त्यांनंतर बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी बोंद्रे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. आता त्यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा २४ ऑगस्टला जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव आणि शेगावात येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच आमदार बोंद्रे यांनी महादेवाला मार्ग दाखव म्हटल्यामुळे आता ते काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.