बुलडाणा - जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरांमधील गेल्या पंधरा वर्षापासून कोष्टी समाजासाठी असलेली स्मशानभूमी यावर झालेले अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. अशाप्रकारे संबंधित समाजाने तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही सदर जमिनीवरील सर्वे नंबर 4 येथील 40 आर जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले नाही. यामुळे आज मंगळवारी 13 ऑक्टोबरला कोष्टी समाजाच्या स्मशान भूमीवर झालेले अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी मृताच्या नातेवाईकांनी 82 वर्षीय महिलेचा मृतदेह चक्क देऊळगांव राजा नगर परिषदेच्या कार्यालय आवारात आणला.
यावेळी मृतदेहांवर नगरपरिषद आवारामध्ये अंतिम संस्कार करण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवताच मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी लेखी आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले. मात्र, या महिलेचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी सुमारे तीन ते चार तास नगर परिषद आवारामध्ये आणून ठेवल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. यावेळी स्थानिक पोलीस उशिरा दाखल झाल्याने संतप्त नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपामध्ये प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.
देऊळगाव राजा शहरांमधील सर्वे नंबर 4 येथील 40 आर कोष्टी समाजासाठी असलेली स्मशानभूमीच्या जमिनीवर गेल्या पंधरा वर्षापासून अतिक्रमण झालेले त्वरित काढण्यात यावे. यासाठी कोष्टी समाजाने तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने देवून स्मशानभूमी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढले गेले नाही. म्हणून आज मंगळवारी वृद्धापकाळामुळे दुर्गापुरा या भागामधील वय 82 वर्षीय सत्यभामा जनार्धन येलगिरे या महिलेचा मृत्यू झाला. मृतकाच्या नातेवाईकांनी चक्क मृतदेह नगर परिषद कार्यालयाच्या आवारात आणला.
यावेळी या मृतदेहांवर नगरपरिषद आवारामध्ये अंतिम संस्कार करण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवताच मुख्याधिकारी निवेदिता घार्गे या नगर परिषदेत पोहचल्या. त्यांनी नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाईकांनी सुमारे तीन ते चार तास नगर परिषद आवारामध्ये मृतदेह न हलविण्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये दत्ता काळे, धर्मराज हनुमंते, रवि एल गिरे, नगरसेवक हनीफ शहा, इस्माईल बागवान, रमेश कायंदे, अतिश कासारे यांच्यासह नगरसेविका पती नवनाथ गोमधरे यांनी मध्यस्थी केल्यामुळे मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने सदरचे प्रकरण शांत झाले.