बुलडाणा - चिखली विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 80 टक्के ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. मतदार संघात एकूण 75 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका झाल्या. यांमध्ये भाजपा विचारसरणीचे सदस्य निवडून आल्याने जवळपास 45 ग्रामपंचायत वर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. तर 20 ग्रामपंचायतीवर मित्र पक्ष व सदस्यांच्या सहकार्याने 65 ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकणार, असा दावा आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनी केला आहे.
नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार-
चिखली तालुक्यातील अनेक गावात भाजपाचे पॅनल निवडणून आले. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला. " भारतीय जनता पार्टीचा विजय असो , जय श्रीराम , भारत माता की जय " अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार करून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावाच्या विकासासाठी कटिबद्ध-
ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या विश्वासाला कुठे ही तडा जाऊ न देता प्रत्येक गावातील आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची प्रत्येक कामे करण्याचे प्रथम उद्दिष्ट आहे. गावा-गावाचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून त्या सर्वांना सोबत घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याचा विश्वास आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला.