बुलडाणा - शहरातील जयस्तंभ चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारण्यात आला. पुतळा उभारणीच्या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड उपस्थित होते.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा
जयस्तंभ चौकामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. अनेक अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. तर भूमिपूजन सोहळा हा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
नियमांचे पालन करून महामानवाला अभिवादन
बुलडाणा शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 130व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादनचे कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आयोजित करण्यात आले होते. तर जयंती उत्सव समितीच्या वतीने 13 एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजता आणि 14 एप्रिलच्या प्रारंभी स्थानिक जयस्तंभ चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आंबेडकर जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळीच बुलडाणा शहरातील मिलिंद नगर, विजयनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विधिवत पूजाअर्चा करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून ग्रहण करण्यात आले. एकंदरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवत सामाजिक अंतर राखून बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि घरगुती स्वरूपात कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा केला आहे.
हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन