बुलडाणा - पुलवामा येथे वीरमरण आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील गोवर्धननगरच्या सुपुत्रास श्रद्धांजली अर्पण करून नवदांपत्य बोहल्यावर चढले आहे. आधी स्मरण वीरणरण आलेल्या जवानांचे नंतर फेरे साता जन्माचे असे म्हणत डहाळके व वाबळे परिवारांमध्ये लग्नगाठ बांघली गेली आहे.
लोणार तालुक्यातील गोवर्धननगरचे नितीन राठोड याना पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले होते. वीर पांग्रा गावचे प्रतिष्ठित नागरिक दत्ताभाऊ नारायण डहाळके यांची सुकन्या वेदिका हिचा विवाह उमरा तालुका, जिल्हा हिंगोली येथील जगन संभाजी वाबळे यांचे चिरंजीव संतोष यांच्याशी गुरुवारी (२५ एप्रिल) संपन्न झाला. दोन्ही कुटुंबातील प्रमुखांनी सामाजिक भान ठेवून देशासाठी वीरमरण आलेल्या नितीन राठोड यांच्या स्मृतीस वधू-वरांच्याहस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी जमलेल्या सर्वाच वर्हाडी मंडळींनीसुद्धा नितीन राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. डहाळके परिवाराने मोठ्या अभिमानाने देशासाठी बलिदान देणाऱया नितीन राठोड यांचा फोटो लग्नपत्रिकेवर छापला आहे. अशाप्रकारे या विवाह सोहळ्यात देशासाठी बलिदान देणाऱया जवानांप्रती असलेली कृतज्ञता वधू-वर तथा त्यांच्या परिवाराने व्यक्त केली आहे.