बुलडाणा - जावयाचा घातपात करणाऱ्यांना अटक करून लोणारच्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी सासऱ्याने वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. संजय बच्छीरे असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी वेळीच बच्छीरे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
लोणार येथील भीमनगरमधील रहिवाशी अमोल अशोक डोंगरे वय २९ वर्ष यांचा २४ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन मटका चक्री जुगाराच्या व्यवसायामुळे घातपात झाल्याची तक्रार संजय बच्छीरे यांनी दिली आहे. संजय बच्छीरे हे मृत अशोक डोंगरे यांचे सासरे आहेत. मात्र पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बच्छीरे यांनी केला आहे. जावयाचा घातपात करणाऱ्यांना अटक करून लोणारच्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बच्छीरे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जावायाला वीस लाखांचा सट्टा लागल्याने घातपात
जावायाच्या डोक्यावर व तोंडावर लागलेल्या जखमा पाहता त्या अपघाताच्या दिसून येत नाहीत. त्यांचा अपघात झाला नसून, हत्या करण्यात आली आहे. अशोक डोंगरे यांना वीस लाखांचा सट्टा लागल्याने त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा आम्हाला संशय आहे. त्यामुळे आम्ही घटनेच्या रात्री 11 च्या सुमारास तक्रार दाखल करण्यासाठी लोणार पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप संजय बच्छीरे यांनी केला आहे.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू
अमोल अशोक डोंगरे यांचा मृत्यू अपघातामुळे झाल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झाले आहे. मात्र तक्रारकर्ते संजय बच्छीरे यांनी तक्रारीत नमूद केलेल्या संशयानुसार तपास सुरू आहे. डोंगरे यांना कोणत्या मटका चक्री जुगारात 20 लाखांचा सट्टा लागला होता हे अद्याप फिर्यादीने स्पष्ट केलेले नाही. तरी देखील तपास सुरू असल्याची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी दिली आहे.